Friday, June 13, 2014

मुलाखत टिप्स

मुलाखत टिप्स

 वेगवेगळया क्षेत्राकरिता वेगवेगळे मुलाखत तंत्र असते. म्हणून त्या क्षेत्रातील वापरात येणार्‍या मुलाखत तंत्राचा अभ्यास करुन मुलाखतीस सामोरे गेले पाहिजे. मुलाखतीमध्ये साधारणपणे तुमच्या बौध्दिक व मानसिक क्षमता व आचारविचारांची परीक्षा घेतली जाते. पूर्वी मुलाखतींचे तंत्र अतिशय साध्या स्वरुपाचे होते. त्यात केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहिली जात असे. आता केवळ बौध्दिक व मानसिक क्षमता न पाहता शारिरीक क्षमता व नेतृत्वगुण सुध्दा पाहिले जातात.
 वैयक्तिक मुलाखतीत आवश्यक असणारे गुण खाली दिले आहेत :
 १. व्यावसायिक व सामान्य ज्ञान
 मुलाखतीस जातांना व्यक्तीची संबंधित व्यावसायिक ज्ञानाची परिपूर्ण तयारी असणे आवश्यक आहे तसेच अपेक्षित प्रश्न व त्यांची उत्तरे तयार केल्यास आत्मविश्र्वासाने मुलाखत देता येते. मूलाखतीमध्ये संबंधित व्यवसायास तुमचा किती फायदा होईल, याचा विचार केला जातो.  त्या व्यवसायासंबंधीचे आधुनिक व नवीन तंत्रज्ञान तुम्हाला अवगत असणे आवश्यक असून यासाठी त्या विषयावरील नवनवीन पुस्तके वाचण्याची गरज आहे. व्यावसायिक ज्ञानाबरोबरच सामान्यज्ञान असणे गरजेचे आहे उमेदवाराची निवड करतांना या गोष्टीचा विचार केला जातो.
 २. संभाषण कला
 मुलाखतीमध्ये प्रश्नोत्तराद्वारे ,संभाषणाद्वारे चाचणी केली जाते. म्हणून भाषेवर तुमचे प्रभुत्व असणे गरजेचे आहे याचा उपयोग चांगल्या पध्दतीने तुमचे विचार व ज्ञान प्रकट करण्यासाठी होतो. तुमचे बोलणे स्पष्ट व मुद्देसूद असणे गरजेचे आहे. चांगल्या संभाषणकलेमुळे निवड करणार्‍या अधिकार्‍यांवर तुमची छाप पडते.
३. आत्मविश्र्वास
 आत्मविश्र्वास हा मुलाखतीतील महत्वचा भाग आहे. मुलाखतीमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल जर तुम्हाला खात्री नसेल तर त्यावेळी उत्तर माहित नाही असे सांगणे योग्य असते. तुमच्या बोलण्या चालण्यातूनसुध्दा आत्मविश्र्वास प्रकट होत असतो. यासाठी मुलाखतीच्या प्रवेशद्वारापासून मुलाखतीच्या बैठक व्यवस्थेपर्यंत जातांना उमेदवाराने मान व शरीर ताठ ठेवून उत्साहाने चालत गेले पाहिजे.
 ४. सकारात्मक विचार
 मुलाखतीस जातांना आपण त्यात यशस्वी होणार, अशी मानसिक वृत्ती ठेवून जाणे म्हणजेच सकारात्मक वृत्ती होय. सकारात्मक दृष्टी असेल तर व्यक्ती त्यादृष्टीने प्रयत्न करुन यशस्वी होते.
 ५. शिस्त
 मुलाखतीस नियोजित वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. मुलाखतीस घाईने धावपळ करुन मुलाखतीची वेळ गाठण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा वाईट परिणाम मुलाखतीवर होतो. मुलाखत कक्षामध्ये परवानगीने प्रवेश करणे, परवानगी मिळाल्याशिवाय स्थान ग्रहण न करणे, मुलाखत संपल्यांनंतर आभार मानणे व जातांना मुलाखत घेणार्‍या व्यक्तीला दिवसाच्या शुभेच्छा देणे, हा उमेदवाराचे आचार-विचार व वर्तणुकीचा भाग आहे.

No comments:

Post a Comment