अल्पवयीनांच्या हातात वाहन दिसल्यास पालकांवरही होणार कारवाई - एपीआय दर्शन शिंदे
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील वाढती वाहतूक आणि अल्पवयीन मुलांकडून सर्रासपणे दुचाकी वाहने चालविण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवत पोलीस प्रशासनाने पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोटारसायकल किंवा इतर कोणतेही वाहन चालविण्यासाठी देऊ नये, अन्यथा संबंधित पालक व वाहनमालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शहरात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास येत असून, त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढत आहे. अशा घटनांमुळे केवळ वाहन चालविणाऱ्या मुलाचाच नव्हे, तर इतर नागरिकांच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलांना वाहनांच्या चाव्या देऊ नयेत आणि त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन चालकांवर तसेच त्यांना वाहन उपलब्ध करून देणाऱ्या पालक किंवा वाहनमालकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य द्यावे.
तसेच मानवत शहरातील सर्व पालकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांना वाहन चालविण्यापासून परावृत्त करावे आणि वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ते अपघातमुक्त आणि सुरक्षित मानवत घडविण्यास सहकार्य करावे, असेही दर्शन शिंदे यांनी नमूद केले.



