Sunday, August 31, 2025

मानवत येथील मोठा कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता व तुटलेला पूल बांधणार -  युवानेते डॉ. अंकुश लाड

मानवत येथील मोठा कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता व तुटलेला पूल बांधणार -  युवानेते डॉ. अंकुश लाड 
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौक परिसरातील मोठ्या कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता आणि तुटलेला पूल यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अखेर या समस्येवर तोडगा निघत असून, रस्ता व पूल उभारणीची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड यांनी दिले आहे.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली समस्या
मोठ्या कब्रस्तानाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. चिखलमय व खडबडीत रस्ता, तसेच मोडकळीस आलेला पूल यामुळे दफन विधीला जाणाऱ्यांना अपार त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर ही समस्या अधिकच भीषण होत होती.
डॉ. अंकुश भाऊ लाड यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांनी तातडीने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
अनेक सुविधा उभारण्याचे आश्वासन
डॉ. लाड यांनी सांगितले की ,मोठा कब्रस्तान परिसरात जाण्यासाठी दर्जेदार रस्ता तयार करण्यात येईल. तुटलेला पूल नवीन करण्यात येईल. तसेच शौचालय सुविधा, गट्टू पॉवर ब्लॉक सीसी रोड, परिसराचे सुशोभीकरण व नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटच्या टेबलांची उभारणी केली जाईल. ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील.
या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी स्वागत करत असून डॉ. अंकुश भाऊ लाड यांचे मनपूर्वक आभार मानले. या वेळी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment