Monday, January 19, 2026

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
[] युवा पँथर्सचे मानवत पोलिस ठाण्यात निवेदन []
मानवत / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील मौजे हमदापूर, ता. मानवत, जि. परभणी येथे गावातील काही जातिवादी गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर संगनमत करून सामूहिक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा पँथर्स (मानवत, ता. मानवत, जि. परभणी) संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिनांक १९ जानेवारी  रोजी मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर हल्ल्यात ६ ते ८ पुरुष व ४ ते ५ महिलांना गंभीर मारहाण करण्यात आली असून, बालक व बालिकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत अमानवी व समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी आरोपींना जामीन न देता, घटनेचा सखोल व तात्काळ तपास करून भादंवि कलम ३०७ सह अन्य गंभीर कलमे लावावीत, तसेच ज्यांच्यावर ठोस पुरावे आहेत अशा सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात ग्रामीण भागातील बौद्ध समाजावर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा युवा पँथर्स संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर रविभाऊ पंडित ,दीपक ठेंगे ,अमोल मगर ,जनार्दन कीर्तने , गौतम जमदाडे,नागसेन भदर्गे, विजय खरात ,किरण पंडित  आदिच्या स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment