Friday, March 27, 2026

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान
मानवत / प्रतिनिधी
इम्रान जाफर शेख रा. इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी यांची छत्रपती संभाजीनगर येथील लोहमार्ग पोलीस पदावर नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या इम्रान जाफर शेख (वय १९) यांनी लहानपणापासूनच शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली होती. मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी कधीही हार न मानता सातत्याने परिश्रम घेतले. दिवस-रात्र मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
इम्रान यांनी कोणत्याही प्रकारच्या क्लासेसवर अवलंबून न राहता स्वतःच्या जिद्दीच्या बळावर अभ्यास केला. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवत अभ्यासाची गती कायम राखली. त्यांच्या या चिकाटीमुळेच त्यांना लोहमार्ग पोलीस पदापर्यंत पोहोचता आले.
त्यांच्या या यशामुळे गावातील इतर तरुणांमध्येही स्पर्धा परीक्षांबाबत उत्साह निर्माण झाला आहे. "परिस्थिती कशीही असली तरी मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश निश्चित मिळते," हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
इम्रान जाफर शेख यांच्या निवडीबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल त्याचे चुलते पो. ना. शेख रसुल यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहे.

Thursday, March 26, 2026

मानवत येथील  प्रभाग क्र. ३ मध्ये एस.आय.आर. कॅम्प चे आयोजन 


मानवत येथील  प्रभाग क्र. ३ मध्ये एस.आय.आर. कॅम्प चे आयोजन 
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये दिनांक २६ मार्च रोजी कृष्णा मंदिर येथे उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या मार्गदर्शना खाली नगरसेवक ॲड. गणेश मोरे पाटील व किशोर लाड यांच्या वतीने एस.आय.आर. कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगर 
परिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी यावेळी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रिया लागू केली असून मानवत शहरातही सध्या ऑनलाईन मॅपिंगची प्रक्रिया सुरू आहे. २००२ च्या मतदार यादीचे मॅपिंग कार्य तहसील कार्यालयामार्फत प्रभागनिहाय बीएलओमार्फत सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांना आवाहान केले होते या  आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक ॲड. गणेश मोरे पाटील व किशोर लाड यांनी आपल्या प्रभागात एस.आय.आर. कॅम्पचे आयोजन केले होते यास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे  परिसरातील यादीनुसार प्रभाग क्र. ३ मधील एकूण ३,३९१ मतदारांपैकी सुमारे ८० टक्के मॅपिंग कार्य पूर्ण झाले आहे.
या उपक्रमांतर्गत नगरसेवक व बीएलओ नागरिकांच्या घरोघरी भेट देऊन मॅपिंगचे काम तत्परतेने करत आहेत. तसेच प्रभागातील नागरिकांकडूनही या कामाला चांगला प्रतिसाद आणि सहकार्य मिळत आहे.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.

Wednesday, March 25, 2026

सोनुळा येथे रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रम संपन्न


सोनुळा येथे रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रम संपन्न
[] व्यापारी माजेद पठाण यांचा पुढाकार []
मानवत / प्रतिनिधी 
रमजान ईदच्या पवित्र निमित्ताने मानवत तालुक्यातील मौजे सोनुळा येथे दिनांक २५ मार्च रोजी भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाळोदि येथील प्रतिष्ठीत व्यापारी माजेद पठाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकत्याच मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र (रमजान ईद) सण मोठ्या आनंदात साजरा झाला. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शेजारील सोनुळा गावात या ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद व्यक्त केला.
यावेळी गावकऱ्यांसाठी विशेष गोड पदार्थांसह पारंपरिक शिरखुर्म्याची स्वादिष्ट मेजवानी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
या प्रसंगी सोनुळा गावचे पोलीस पाटील बालासाहेब भोरकडे, युवानेते अमोल भोरकडे, सुदाम भोरकडे, सुभाष भोरकडे, अनंता भोरकडे, अनुरुद्ध पाष्टे, उद्धव भोरकडे, माणिक दंडे, गणेश पाष्टे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, एकोपा आणि परस्पर प्रेम वाढवणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Saturday, March 21, 2026

रमजान ईद निमित्त मानवत येथे सुनील शेट्टी (अन्ना) यांची सदिच्छा भेट

रमजान ईद निमित्त मानवत येथे सुनील शेट्टी (अन्ना) यांची सदिच्छा भेट
 [] मुस्तखीम बेलदार यांच्या वतीने  यथोचित सत्कार []
मानवत / प्रतिनिधी 
मुंबई येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक सुनील शेट्टी (अन्ना) यांनी रमजान ईद निमित्त मानवत येथे राज बेलदार संघटनेचे राज्य अध्यक्ष मुस्तखीम बेलदार यांची सदिच्छा भेट घेतली. या आगमनावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मुस्तखीम बेलदार यांच्या वतीने सुनील शेट्टी  (अन्ना) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. दोन्ही मान्यवरांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजातील विविध प्रश्न व विकासात्मक उपक्रमांवर सकारात्मक चर्चा झाली.
या कार्यक्रमास गेवराई येथील मा. जि. प. सदस्य शेख रहीम साहेब, मानवत येथील उद्योजक माजेद पठाण, समाजसेवक एकबाल राज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील ऐक्य व सलोखा अधिक दृढ होण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Sunday, March 15, 2026

आठ वर्षीय शेख सलीम यांचा पहिला रोजा संपन्न

आठ वर्षीय शेख सलीम यांचा पहिला रोजा संपन्न

नारेगाव / प्रतिनिधी
रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवून उपवास करतात. विशेषतः लहान मुलांसाठी हा एक महत्त्वाचा आध्यात्मिक आणि मानसिक अनुभव असतो या निमित्त  नारेगाव  येथील अवघ्या आठ  वर्षांच्या शेख सलीम शेख साजीद वय ८ वर्ष यांनी तपत्या उन्हात दि.१४ मार्च रोजी  आपल्या आयुष्याचा पहिला रोजा ठेवत धार्मिक श्रद्धेचे अनोखे उदाहरण सादर केले आहे.
शेख सलीम  यांनी आपल्या कुटुंबासोबत रोजा ठेवण्याचा निर्धार केला आणि संपूर्ण दिवस उपवास करून रमजानच्या पवित्रतेची अनुभूती घेतली. त्यांच्या या धैर्याने आणि श्रद्धेने संपूर्ण कुटुंबासह समाजातील लोकही भारावून गेले आहेत.

शेख सलीम  यांच्या या धार्मिक जाणीवेचे त्यांचे आजी, आजोबा हाजी शेख जफर , शेख चाँद ,आई,वडील शेख साजीद , मामा शेख तारेख ,चुलते शेख वाजीद , शेख आरेफ ,शेख वसीम , सय्यद अरबाज , सय्यद दानिश तसेच मित्र  मंडळांकडून विशेष कौतुक करत शुभेच्छा देण्यात आल्या आहे  त्यांच्या या समर्पणामुळे परिसरात आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेख सलीम याचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.

Thursday, March 12, 2026

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील बॅरिकेट्स हटवण्याची नगरसेवकांची मागणी


परभणी शहरातील जिंतूर रोडवरील बॅरिकेट्स हटवण्याची नगरसेवकांची मागणी
परभणी / प्रतिनिधी
परभणी शहरातील जिंतूर रोड येथील जांब नाका दर्गा कमान समोरील मुख्य रस्त्यावर शहर वाहतूक सुरक्षा पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ परभणी महानगरपालिकेतील नगरसेवकांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिंतूर रोडवरील जांब नाका दर्गा कमान समोरील रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सदर रस्ता हा सरकारी दवाखान्याकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे रुग्णवाहिका तसेच रुग्णांना दवाखान्यात ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच दर्गा रोड परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य मार्ग असून परिसरातील अनेक रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.
यामुळे सदर ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर इनामदार नदिम अहमद, शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकीरा बेगम मोहम्मद नईमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जागीरदार आणि खान मुसदिक नुरुल्ला खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Sunday, March 1, 2026

आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात [] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश[]

आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात
[] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश []
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील आंबेडकर नगर पश्चिम भागातील गेल्या २० ते २५ वर्षांपासून रखडलेला जागा मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या प्रभागातील नागरिकांकडून वारंवार युवा नेते तथा उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या विषयाबाबत मागणी करण्यात येत होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर या जागेच्या मोजणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या कामाची सुरुवात डॉ. अंकुश लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली. अनेक पिढ्यांनी ज्या कामाची प्रतीक्षा केली, ते काम आता पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसरात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेवक राजू भैय्या खरात, नगरसेवक गणेश भाऊ उगले, ओमभाऊ सिद्धार्थ ढाले, समाजसेवक असद खान, नगर परिषद मानवत येथील अभियंते तसेच आंबेडकर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.