Wednesday, April 29, 2026

उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा; मानवतकरांना वेळेत स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा; मानवतकरांना वेळेत स्वच्छ पाणीपुरवठा सुरू
मानवत  / मुस्तखीम बेलदार
 मानवत शहरात अनेक दिवसांपासून नागरिकांना पिवळसर रंगाचे पाणी तसेच अनियमित वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या गंभीर समस्येची दखल घेत उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी गेल्या ८ ते १५ दिवसांपासून सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आता शहरवासीयांना मिनरल वॉटरप्रमाणे स्वच्छ पाणी आणि वेळेत पाणीपुरवठा मिळू लागला आहे.

शहरातील जुन्या यंत्रणेमुळे पाण्याची गुणवत्ता खालावत होती. नागरिकांना पिवळसर व गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. यावर तातडीने उपाययोजना करत डॉ. लाड यांनी नवीन विद्युत पंप बसवले, जलशुद्धीकरण प्रकल्पातील विविध तांत्रिक दुरुस्त्या केल्या तसेच आवश्यक सामग्री नव्याने उपलब्ध करून दिली.

यासोबतच क्लारिफ्लूकेटर प्युरिफायर ब्रिज सुरू करण्यात आला, एअर कॉम्प्रेसर कार्यान्वित करण्यात आले आणि फिल्टरमधील जुनी रेती बदलून नवी रेती टाकण्यात आली. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक सक्षम झाली असून पाण्याचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारला आहे.

विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण प्रकल्पातील रेती बदलण्याचे काम सुरू असताना उपनगराध्यक्ष डॉ. लाड यांनी केवळ आदेश देऊन थांबण्याऐवजी स्वतः प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. ते स्वतः रेतीच्या हौदात उतरले आणि कामगारांसोबत रेती बदलण्यास मदत केली. त्यांच्या या कार्यशैलीची शहरात सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.

शहरातील प्रत्यक्ष पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती आणि सुधारणा कामेही युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना नियोजित वेळेत पाणी मिळावे यासाठी डॉ. लाड स्वतः देखरेख करत आहेत.

या कामासाठी मुख्याधिकारी कोमल सावरे, पाणीपुरवठा अभियंता बळवंते, अभियंता सय्यद अन्वर, पाणीपुरवठा विभागाचे सचिन सोनवणे, कर्मचारी विठ्ठल पवार व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सन १९९० मध्ये उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला नवसंजीवनी देत डॉ. अंकुश लाड यांनी शहरवासीयांच्या मूलभूत गरजेला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता मानवत शहराला महानगरांप्रमाणे शुद्ध व वेळेत पाणी मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Uploaded Image

Monday, April 27, 2026

एन एम एम एस  गुणवंत विद्यार्थ्यांचा उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते सत्कार

एन एम एम एस  गुणवंत विद्यार्थ्यांचा उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते सत्कार

मानवत प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार
पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवत येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन एम एम एस) परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मानवत शहराचे उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. लाड यांनी एन एम एम एस परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांनी एन एम एम एस सारख्या प्रतिष्ठित परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, शाळेच्या शिक्षकवृंदांनी केलेल्या मागणीनुसार आमदार राजेशदादा विटेकर यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शौचालय बांधकाम करण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. लाड यांनी सांगितले की, यापूर्वीही शाळेसाठी स्वखर्चाने रस्ता बांधून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, सुविधा वाढीसाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या वतीने डॉ. अंकुश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे आभार मानले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक माणिक घाटूळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा राणीताई गोलाईत, नगरसेवक मोहनराव लाड, एसएमसी सदस्य रामभाऊ गोलाईत, संदीप पवार, नामदेव खिळदकर, कीर्तनकार, सुनील बोरबने, श्रीराम पकवाने, नागनाथ कुऱ्हाडे, सुरेश गोलाईत, मार्गदर्शक शिक्षक मनोज वांगीकर, राजेभाऊ एडके तसेच मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

Uploaded Image