उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा; मानवतकरांना वेळेत स्वच्छ पाणीपुरवठा सुरू
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरात अनेक दिवसांपासून नागरिकांना पिवळसर रंगाचे पाणी तसेच अनियमित वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या गंभीर समस्येची दखल घेत उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी गेल्या ८ ते १५ दिवसांपासून सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आता शहरवासीयांना मिनरल वॉटरप्रमाणे स्वच्छ पाणी आणि वेळेत पाणीपुरवठा मिळू लागला आहे.
शहरातील जुन्या यंत्रणेमुळे पाण्याची गुणवत्ता खालावत होती. नागरिकांना पिवळसर व गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. यावर तातडीने उपाययोजना करत डॉ. लाड यांनी नवीन विद्युत पंप बसवले, जलशुद्धीकरण प्रकल्पातील विविध तांत्रिक दुरुस्त्या केल्या तसेच आवश्यक सामग्री नव्याने उपलब्ध करून दिली.
यासोबतच क्लारिफ्लूकेटर प्युरिफायर ब्रिज सुरू करण्यात आला, एअर कॉम्प्रेसर कार्यान्वित करण्यात आले आणि फिल्टरमधील जुनी रेती बदलून नवी रेती टाकण्यात आली. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक सक्षम झाली असून पाण्याचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारला आहे.
विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण प्रकल्पातील रेती बदलण्याचे काम सुरू असताना उपनगराध्यक्ष डॉ. लाड यांनी केवळ आदेश देऊन थांबण्याऐवजी स्वतः प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. ते स्वतः रेतीच्या हौदात उतरले आणि कामगारांसोबत रेती बदलण्यास मदत केली. त्यांच्या या कार्यशैलीची शहरात सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.
शहरातील प्रत्यक्ष पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती आणि सुधारणा कामेही युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना नियोजित वेळेत पाणी मिळावे यासाठी डॉ. लाड स्वतः देखरेख करत आहेत.
या कामासाठी मुख्याधिकारी कोमल सावरे, पाणीपुरवठा अभियंता बळवंते, अभियंता सय्यद अन्वर, पाणीपुरवठा विभागाचे सचिन सोनवणे, कर्मचारी विठ्ठल पवार व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सन १९९० मध्ये उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला नवसंजीवनी देत डॉ. अंकुश लाड यांनी शहरवासीयांच्या मूलभूत गरजेला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता मानवत शहराला महानगरांप्रमाणे शुद्ध व वेळेत पाणी मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment