शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आमदार राजेश दादा विटेकर
[] ९ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन []
मानवत/मुस्तखीम बेलदार
शहरांच्या विकासात मानवत नगरपालिका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन आ. विटेकर यांनी केले. शनिवार १२ ऑक्टो. रोजी ११ वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर जुन्या तहसीलच्या जागेवर नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश विटेकर स्वतः होते. तर विचार मंचावर ह भ प १००८ मनीषानंद पुरीजी महाराज, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, विजयकुमार कत्रुवार, विकासशील युवा नेतृत्व डॉ. अंकुश लाड, सुरेश काबरा, माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील, संजयकुमार लड्डा, गिरीश कत्रुवार आदी होते. पुढे बोलताना विटेकर म्हणाले, पाथरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत मानवत नगरपालिका सर्वात पुढे आहे. मागील काळात आपण मानवत नगरपालिकेला कधीही निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द पूर्ण करत आपण दोन महिन्याच्या काळात वीस कोटी पक्षा जास्त निधी मानवत नगरपालिकेला दिला आहे. पुढच्या काळातही विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विजयकुमार कत्रुवार व ह.भ.प. १००८ मनीषानंद पुरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, बालाजी कुऱ्हाडे, दत्ता चौधरी, मोहन लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रा. अरविंद घारे, सचिन कोक्कर ,नजीर विटेकर यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, व्यावसायिक, व्यापारी, न.प. कर्मचारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अनिरुद्ध पांडे यांनी तर संचालन किशोर तुपसागर यांनी केले.
[] विकासाचा रथ अव्याहत धावणार - डॉ. अंकुश लाड
नूतन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना युवानेते डॉ. अंकुश लाड म्हणाले विकासाचा रथ अव्याहतपणे धावणार आहे. तरुण व्यापारी व व्यवसायिकांसाठी शहरामध्ये अद्ययावत व्यापारी संकुलाची गरज होती. तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी बरोबरच व्यापार-व्यवसाय वाढण्याची आवश्यकता होती. मानवतची बाजारपेठ एका मुख्य रस्त्यावरच उभारलेली असल्याने बाजारपेठेचे विकेंद्रीकरणही होणे गरजेचे होते. एकाच रस्त्यावर पूर्ण बाजारपेठे असल्यामुळे विशेषतः बाजाराच्या दिवशी संपूर्ण रस्ता रहदारीसाठी जाम होत होतो. याच रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट शाखा व व्यापारी दुकाने आहेत. मात्र वाहन पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. नवीन होणाऱ्या व्यापारी संकुलात २८ गाळे हे तळमजल्यावर, पाहिल्या मजल्यावर ६ गाळे व १६०० चौरस फूट मध्ये विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांसाठी अद्यावत असे वाचनालय होणार आहे. याशिवाय या संकुलात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे. या संकुलामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. एवढ्या दुकानांवर भागणार नाही याची मला जाणीव आहे. यापुढेही नवीन व्यापारी संकुले उभी करून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करू. या बरोबरच काही राष्ट्रीयकृत बँकेसोबत करार करून बँकांनाही या ठिकाणी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी ते म्हणाले.