Sunday, December 21, 2025
मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय
मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय
मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय
२२ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; डॉ. अंकुश लाड यांची एकाकी झुंज यशस्वी
मानवत /प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागातील २२ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी झेंडा फडकवला तर शिवसेना शिंदे गटाचे ४, भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीच्या राणी ताई अंकुश लाड यांनी ५३९१ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्का मोर्तब केला.
राणी अंकुश लाड यांना २३,९८९ पैकी १४,५८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सेना-भाजप युतीच्या अंजली कोक्कर यांना ९,१९६ मते पडली. रविवारी (ता.२१) तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला होता.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले प्रभाग १ ब मध्ये अनुराधा वासुंबे विजयी झाले
प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेच्या विभा भदर्गे विजयी झाले. तर प्रभाग २ ब मध्ये ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुन्हाडेंचा नजीकच्या १० मतांनी पराभव करीत विजय मिळवला.
प्रभाग ३ अ राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी विजय मिळवला, ३ ब मध्ये नंदनी गणेश मोरे पाटील यांनी विजय संपादित केला
४ अ द्वारका दत्तात्रय चौधरी यांनी विजय मिळविला तर ब मध्ये भाजपाचे उमेदवार शैलेंद्र राजेश्वर कत्रुवार यांनी विजय मिळविला ५ अ मध्ये विक्रम सिंह दहे यांनी फक्त दोन मतांनी विजय मिळविला तर ब मध्ये राष्ट्रवादीचे वृषाली राहटे यांनी विजय मिळविला ६ अ मध्ये मीरा मोहन लाड तर, ६ ब संजय कुमार बांगड यांनी विजय मिळविला, ७ अ मध्ये रेखा बाजीराव हालनोर यांनी विजय मिळविला, ७ ब मध्ये नियामत खान यांनी विजय मिळविला, ८ अ मध्ये शेख जवेरिया बेगम आहाद बेलदार तर ब मध्ये मोहम्मद बिलाल मोहम्मद युनूस बागवान यांनी यश संपादित केले ९ अ मध्ये सुशीला बालाजी लाड तर ब मध्ये भाग्यश्री स्वप्निल शिंदे हे विजयी झाले १० अ मध्ये रूपाली गणेश उगले तर ब मध्ये डॉक्टर अंकुश बालाजी लाड हे विजयी झाले ११ अ मध्ये डॉक्टर देवयानी राजेश्वर दहे तर ब मध्ये उ बा ठा चे दीपक बारहाते हे विजयी झाले आहे
विजयानंतर बोलताना डॉ. अंकुश लाड म्हणाले, "ही जिंकलेली बाजी माझी नाही, मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. भविष्यात विकासाला नवा वेग देत शहराचा चेहरा पालटू. जनतेचा विश्वास कायम ठेवू," असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला.
मानवत नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नामांकित नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सईद खान व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप आघाडीने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र अपेक्षेपेक्षा फिके पडत आघाडीला चार जागांपुरती मर्यादा राहावी लागली तर भाजपचा फक्त एक उमेदवार विजयी झाला.
निवडणुकीचा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऐतिहासिक यश ठरला असून मानवत शहरातील राजकीय समीकरणाला नवे परिमय मिळाले आहे. जनतेच्या विश्वासाने विकासाला दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Saturday, December 20, 2025
“मी आयुक्त होणार!” प्रकल्पांतर्गत नारेगाव मनपा उर्दू शाळेचे विद्यार्थी आयुक्तांच्या घरी
"मी आयुक्त होणार!" प्रकल्पांतर्गत नारेगाव मनपा उर्दू शाळेचे विद्यार्थी आयुक्तांच्या घरी
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, नारेगाव येथील विद्यार्थ्यांनी "मी आयुक्त होणार!" या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत थेट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व प्रशासकीय जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या संकल्पनेतून "मी आयुक्त होणार!" हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दर रविवारी एका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आयुक्तांचे पाहुणे बनवून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली जाते.
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, नारेगाव येथील विद्यार्थी आदरणीय मुख्याध्यापकश्री. सय्यद अबरार अहमद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. विद्यार्थ्यांनी बंगल्याच्या परिसरात विविध खेळ खेळत आनंद लुटला व उत्साही वातावरण निर्माण झाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आयुक्त सरां समोर आपल्या स्वरचित कविता व प्रेरणादायी ओळी सादर केल्या. काही विद्यार्थ्यांनी शाळेत तयार केलेले डी.आय.वाय. विज्ञान प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले. तर काहींनी शालेय स्तरावर साकारलेल्या विविध कलाकृती, हस्तकला व ऐतिहासिक वस्तूंचे हस्तलिखित अल्बम सादर केले.
विद्यार्थ्यांनी कागदापासून तयार केलेली फुले, बुके तसेच नूतन वर्षाच्या शुभेच्छा पत्रांद्वारे आयुक्तांचे अभिनंदन केले. इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने आपल्या चित्रकलेद्वारे तयार केलेला आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांचा सुंदर फोटो भेट म्हणून सादर केला.
यावेळी आदरणीय श्री जय श्रीकांत सर व त्यांच्या कुटुंबीयांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली ,इयत्ता नववी व दहावीच्या मुलींनी तर मॅडम च्या व त्यांच्या मुलीच्या हातावर मेंहदी काढली. याप्रसंगी विद्यार्थिनीने सरांसमोर गीत सादर केले आजचे विशेष प्रसंग म्हणजे इयत्ता आठवीचा एक विद्यार्थी शेख सादिक फारुख याने सरांना उर्दू कॅलिग्राफी मध्ये सरांचा नाव लिहून भेट म्हणून दिला होता सरांना तो खूप आवडला सरांनी तो नाव स्वतःच्या अक्षरात लिहून दाखवले व स्वतःच्या नावात येणारे उर्दू अक्षरांच्या बारीकीने निरीक्षणही केले इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी एक इंग्लिशची वन लेटर टू टेन लेटर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह वर्ड्स ऍक्टिव्हिटी सादर केली.
आजच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःही एक शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न रंगले आहे व शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे व आपल्या भविष्यामध्ये उंच भरारी घेण्याची एक नव चेतना निर्माण झाली आहे .
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून, भविष्यात प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.यावेळी सांगळे सर ,मुख्याध्यापक अबरार सर , जुबेर सर, खुरत बाजी, नाझीया बाजी , आफ्रिन बाजी उपस्थित होते.
Thursday, December 18, 2025
पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?
पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?
मानवत / मुस्तखीम बेलदार
म्हणतात की समाजकारणातूनच व्यक्ती राजकारणात प्रवेश करते; मात्र सध्याच्या काळात सर्वसाधारण गरीब समाजसेवकाला राजकारणात खरोखर वाव मिळतो का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आज बहुतांश राजकीय पक्ष उमेदवाराच्या सामाजिक कार्याऐवजी त्याची आर्थिक क्षमता पाहूनच पक्षाचे तिकीट देत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
समाजसेवक हे निष्ठेने व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असतात. दिवस-रात्र, वेळ-अवेळी कोणालाही अडचण आली तर सर्वप्रथम हेच गरीब समाजसेवक मदतीसाठी पुढे येतात. रात्री-अपरात्री , रेशन, शासकीय कामे, आजारपण, अंत्यसंस्कार अशा विविध अडचणींमध्ये हेच समाजसेवक कोणताही मोबदला न घेता सर्वसामान्यांचे काम करून देतात
मात्र निवडणुकीच्या काळात लोकांना पैशाचा मोह सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक म्हणजे पैसा, अशीच मानसिकता तयार झाल्याने प्रामाणिक समाजसेवकांना डावलले जात असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून समाजासाठी झटणारे अनेक समाजसेवकही आता समाजसेवा करण्याबाबत धास्ती घेत असल्याचे जाणवत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये अनेक सर्वसाधारण गरीब समाजसेवकांनी निवडणूक लढवण्याऐवजी त्यापासून अलिप्त राहणे पसंत केले. कारण निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते आणि हा पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न सामान्य माणसासमोर उभा राहतो आहे.
जर ही च परिस्थिती अशीच कायम राहिली, तर त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अडीअडचणीच्या वेळी मोठमोठे नेते कामी येत नसून, हेच गरीब समाजसेवक सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे मतदारांनी केवळ पैशाकडे न पाहता प्रामाणिक समाजसेवकांच्या कार्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.