Thursday, December 18, 2025

पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?

पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?

मानवत / मुस्तखीम बेलदार

म्हणतात की समाजकारणातूनच व्यक्ती राजकारणात प्रवेश करते; मात्र सध्याच्या काळात सर्वसाधारण गरीब समाजसेवकाला राजकारणात खरोखर वाव मिळतो का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आज बहुतांश राजकीय पक्ष उमेदवाराच्या सामाजिक कार्याऐवजी त्याची आर्थिक क्षमता पाहूनच पक्षाचे तिकीट देत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
समाजसेवक हे निष्ठेने व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असतात. दिवस-रात्र, वेळ-अवेळी कोणालाही अडचण आली तर सर्वप्रथम हेच गरीब समाजसेवक मदतीसाठी पुढे येतात. रात्री-अपरात्री , रेशन, शासकीय कामे, आजारपण, अंत्यसंस्कार अशा विविध अडचणींमध्ये हेच समाजसेवक कोणताही मोबदला न घेता सर्वसामान्यांचे काम करून देतात
मात्र निवडणुकीच्या काळात लोकांना पैशाचा मोह सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक म्हणजे पैसा, अशीच मानसिकता तयार झाल्याने प्रामाणिक समाजसेवकांना डावलले जात असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून समाजासाठी झटणारे अनेक समाजसेवकही आता समाजसेवा करण्याबाबत धास्ती घेत असल्याचे जाणवत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये अनेक सर्वसाधारण गरीब समाजसेवकांनी निवडणूक लढवण्याऐवजी त्यापासून अलिप्त राहणे पसंत केले. कारण निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते आणि हा पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न सामान्य माणसासमोर उभा राहतो आहे.
जर ही च  परिस्थिती अशीच कायम राहिली, तर त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अडीअडचणीच्या वेळी मोठमोठे नेते कामी येत नसून, हेच गरीब समाजसेवक सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे मतदारांनी केवळ पैशाकडे न पाहता प्रामाणिक समाजसेवकांच्या कार्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment