मानवत तालुक्यातील विकास कामांसाठी
तीन वर्षात ४४१ कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे काम सुरु असून गेल्या तीन वर्षात मानवत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४४१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मानवत येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित विस्तारीत समाधान शिबीर पूर्वतयारीसंदर्भात आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते राहुलभैय्या लोणीकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, अनिल नखाते, गणेशदादा रोकडे, विठ्ठलराव राबदडे, अनंतराव गोलाईत,अतुल मणियार, श्रीकांत माकुडे,उद्धवराव नाईक, पी.दि. पाटील, बाबासाहेब फळे, नानासाहेब वाकणकर, शिवहरी खिस्ते, चंद्रकांत चौधरी, उमेश देशमुख, सुभाष आंबट, मोहन धाराशिवकर, डॉ राठी, मधुकर नाईक, हनुमान घुंबरे, बेग, दादाराव रासने, शिवराज नाईक, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी कोकणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, तहसीलदार शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. लोणीकर पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवत तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७३ कोटी ५८ लाख, जलयुक्त शिवार २२ कोटी ९३ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजना ४ कोटी ४२ लाख, स्वच्छ भारत अभियान ( ग्रामीण) ५ कोटी ८९ लाख , कृषी विभाग योजनांना अनुदान ७ कोटी १३ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना १३ कोटी ७२ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग १९ कोटी २७ लाख आदी कामांचा समावेश असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत ४० कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती ना. लोणीकर यांनी दिली.
गावोगाव विजेचा प्रश्न सोडविण्यात येत असून, पाथरी तालुक्यात २ उपकेंद्र व विद्दुतिकारणाच्या कामासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यात पीक विमा योजनेअंतर्गत ११८ कोटी तर दुष्काळी अनुदानापोटी ६३ कोटी ७० लाख रुपयांचे वाटप झाल्याचे ना. लोणीकर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच होणाऱ्या समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात एक लाख लोकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरु आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही संपर्कमंत्री लोणीकर यांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस व टाकी, बचत गटाच्या लाभार्थ्यंना प्रत्येकी एक लाख रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.