मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
ग्रामीण भागातून मानवत शहरात येणाऱ्या महिला आणि शहरातील माता-भगिनींसाठी लवकरच सुविधायुक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
महिलांना शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यामध्ये शौचालयाच्या अपुऱ्या सुविधांमुळे होणारा त्रास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समस्येच्या स्थायी समाधानासाठी लवकरच नियोजन करून आवश्यक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे डॉ. लाड यांनी स्पष्ट केले.
तसेच, महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आधुनिक शौचालयांची उभारणी करून त्या ठिकाणी योग्य स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लवकरच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.