Friday, August 25, 2023

पाण्याचा काटकसरीने वापर करा मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांचे आवाहन

पाण्याचा काटकसरीने वापर करा
मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांचे आवाहन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 या वर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत  पडलेला पाऊस पहाता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे हीच काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तालुक्यात पडलेला पाऊस सरासरीच्या खूपच कमी आहे त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे 
मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांनी आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांची खरिपाची पिके सुकू लागली आहेत. मुगाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन सारख्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते. परंतु पाऊसच नसल्याने या पिकाची स्थितीही दयनीय झाली आहे. कापसाच्या पिकाला पाणी कमी लागत असले तरी पाऊस पाहिजेच. उर्वरित काळात पावसाची उणीव भरून निघेल की नाही याची शंका आहे. उरलेल्या पावसाच्या दिवसात योग्य प्रमाणात आणि सरासरी पेक्षा  कमी पाऊस झाला तर जमिनीतील पाण्याची पातळी निश्चितच खोल जाणार आहे. आशा स्थितीत जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठी आत्ता पासूनच उपाय करण्याची गरज आहे. पाणी निर्माण करता येत नसल्याने त्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. पाणी बचती बाबत लोकांना जागरूक करणेही तेवढेच महत्वपूर्ण ठरणार आहे. 'पाणी हे नुसते द्रव्य नाही तर ते अमृततुल्य आहे'. आणि 'पाण्याची बचत म्हणजेच पाणी निर्मिती'. हे मूल्य समाजमनात रुजविणे गरजेचे आहे. हवामान विभागाचा अंदाज आणि वृत्तपत्रातील बातम्या पहिल्या तर यावर्षीच्या मान्सूनवर अलनिनो चा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. जून, जुलै व ऑगस्ट च्या तुलनेत सप्टेंबर मध्ये याची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. न.प. प्रशासन त्या दृष्टीने खबरदारी घेत आहे. मानवत शहराला पाणी पुरवठा करणारा झरी तलाव नेमकाच भरून घेतला आहे जवळपास सहा ते सात महिने हे पाणी शहरवासीयांना पुरेल. सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस झाला तर  एखादा महिना पुन्हा जास्तीचे पाणी पुरेल मात्र एप्रिल ते जून महिन्याच्या शेवटी पर्यन्त टंचाई जनावण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही याबाबत जागरूक असायला हवे. 'पाणी हेच जीवन' अथवा 'जल हैं तो कल हैं'. या म्हणी अंगी बनवून आपणा सर्वांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. आपण जल संसाधनांची संख्या वाढवू शकत नाही, परंतु जे काही उपलब्ध आहे त्याला वाया जाण्यापासून रोखू शकतो. ही भूमिका घेऊन प्रत्येकाला काम करावे लागणार आहे असे युवानेते डॉ.अंकुश लाड म्हणाले.
                
                

No comments:

Post a Comment